दोस्तहो, ह्या जीवलागांनी दूर जेव्हा लोटले
त्याच वेळी दश दिशांनी बहुत मजला घेतले
सांगतो ती 'पूर्व' ऐसे पुत्र बोलू लागले
'सूर्य' आणि 'पूर्व' यांचे नाते विरून गेले
त्याच वेळी 'पश्चिमे' चे दूत आले स्वागता
ध्यानात आले, जीवनाची झाली आता सांगता
चेक कैसा मी लिहावा. हात कापे सारखा
माझी च का हि स्वाक्षरी, हा प्रश्न पडला सारखा
आतुरता होई मुलांना, ह्याच, त्या एका क्षणाची
घेतली काढून त्यांनी . खाते वही संचिताची
त्यांचे कृपेने लाभेल जैसी, ती च झाली दक्षिणा
बोलली 'दक्षिण' तेव्हा, येवू कैसे रक्षणा
प्रश्न पुसता प्रेमभावे, मिळती कटू प्रतृतरे
'उत्तरेचा' अर्थ म्हणजे निरुतरे आणि दुरूत्तरे
कैसा त्यांना मी विचारू जाब ह्या वर्तानाचा
त्यांच्याच हाती प्रश्न माझा दोन प्रहरी जेवणाचा
'आग्नेय' राही दूरवरती, जाथाराटला अग्नी खरा
अर्थ ह्या मधल्या दिशेला, वृधापाकली कळला खरा
'वायव्य' मजला कानात संगे, तत्व साऱ्या जीवनाचे
'व्यय' कशाला व्यर्थ करशी, 'ईशान्य' दिशी जायचे
'ईश' म्हणता नजर माझी 'ऊर्ध्व' आकाशास गेली
ऋतू तुझे संपून गेले, 'नैरुत्य' हि उदगारली
येई वत्सा, ये फिरुनी, शब्द हे कोठुनी आले
नऊ दिशांना पाहता मी, तोंड त्यांनी फिरविले
दिशा दहावी स्मशानभूमी,कुशीत घेण्या सज्ज होती
जन्मांतरीची माय माझी , आर्त हाक देत होती.
वा.वा. पाटणकर